जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मुलींसह महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार, २४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीतेने लहान बहिणीला शाळेत सोडले.
दरम्यान, परतत असताना संशयित दिनेश रमेश भिल (रा.शांताबाई नगर) याने पीडीतेला रिक्षात बसवून शहरातील एका बंद शाळेच्या आवारात नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल’, अशी धमकी दिली.
हा प्रकार पिडीत मुलीने घरी सांगितला. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित दिनेश रमेश भिल रा. शांताबाई नगर, अमळनेर यांच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक युवराज बागूल तपास करीत आहेत.