धक्कादायक! ‘मदर्स डे’च्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून खून, जळगावातील घटना

एरंडोल : प्लॉट विक्रीच्या वादातून व कौटुंबिक कारणावरून विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) (वय ६०) या वृद्धेचा दगडावर आपटून तिच्याच मुलाने व सुनेने हत्या केल्याची घटना येथील केवडीपुरा भागात रविवारी भल्या पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मुलगा बापू रोहिदास मोहिते (बेलदार)  व सून शिवराबाई बापू मोहिते  यांना ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. मृत महिलेच्या राहत्या घराशेजारी तिच्या नावे असलेला खुला भूखंड मुलगा बापू मोहिते यास विकायचा असल्याने मुलगा व सून वारंवार त्रास व मारहाण करीत असल्यामुळे मृत महिला ही धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील नातेवाईकांकडे काही काळ वास्तव्यास होती.

समाजातील प्रतिष्ठित लोकांनी मुलगा व सून यांस समजावून विमलबाई हिस एरंडोल येथे एकत्र राहण्यास पाठवले होते. रविवारी पहाटे साडेतीन वाजता दोन्ही आरोपींनी दगडाने ठेचून विमलबाई मोहिते हिचा निघृण खून केला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्यात वापरलेला दगड हस्तगत केला. तपास पोलीस निरीक्षक गोराडे हे करीत आहेत