धुळयुक्त रस्त्यांमुळेच जळगावची हवा प्रदूषित

जळगाव : शहरातील धुळयुक्त व नादुरूस्त खराब रस्त्यांमुळे हवेची गुणवत्ता अत्यंत नित्कृष्ट आहे. स्वातंत्र्य चौकातील जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक हवामानासह विविध माहिती दर्शविणारा इलेक्ट्रॉनिक बोर्ड आहे. यावर शुक्रवारी सायंकाळी हवेची गुणवत्ता अत्यंत नित्कृष्ट असून ३२५ निर्देशांक दर्शवित असल्याचे वृत्त दै.तरुण भारतने शनिवार, ५ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. तसेच उन्हाळ्यात धुळगाव तर पावसाळ्यात जलगाव अशा आशयाचे वृत्त देखिल मे-जून दरम्यान प्रसिद्ध केले होते.

याची दखल घेत मनपा बांधकाम विभाग अभियंते यांनी मे २०२२ मध्येच मनपा प्रशासनास १०० कोटी निधीपैकी ४२ कोटी निधीतून मंजूर कामांसाठी पाच कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. परंतु शहरातील एकाही रस्त्याचे काम पूर्णत्वास आलेले नाही. मनपा लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्या उदासिनतेमुळे या अपूर्ण कामांमुळेच जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय व धुळयुक्त असल्याचे समोर आले आहे.

शहरातून पाचोरा चाळीसगावकडे जाणारा पूर्वीचा राज्यमार्ग क्रमांक १५९ राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आला असला तरी, मनपा हद्दीतील इच्छादेवी चौक ते डी मार्ट दरम्यान रस्ता मनपा प्रशासन स्वतः करणार असल्याने ‘नही’कडे वर्ग केलेला नाही. तसेच या रस्त्याचे कामदेखील पूर्ण केले नाही. शिवाय अन्य रस्त्यांची कामेदेखील ठेकेदारांकडून अपूर्णावस्थेत सोडून दिले आहेत. त्यामुळे शहरात बर्‍याच ठिकाणी धुळयुक्त रस्ते आहेत. दीपोत्सवादरम्यान फटाक्यांमुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता होती. परंतु फटाक्यांपेक्षा शहरातील धुळयुक्त रस्त्यांमुळे शहर वासियांना अशुद्ध आणि धुळयुक्त हवेचा फटका सहन करावा लागत आहे.

राज्य शासनाने शहर विकासांतर्गत १०० कोटींपैकी पहिल्या टप्प्यात ४२ कोटींचा निधी मंजूर कामासाठी देय आहे. यात सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत मनपा प्रशासनास पाच कोटीचा निधी मे २०२२ मध्येच वर्ग करण्यात आला आहे. तर रस्ते विकास अंतर्गत ३८.२८ मंजूर निधीपैकी २६.८० कोटी निधी शासन अनुदान अनुज्ञेय आहे. त्यानुसार ८.९३ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला असल्याचेही मनपा आयुक्त तसेच बांधकाम विभाग अभियंता यांनी म्हटले आहे.