पारोळा : इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीची मतदारांना ओळख व्हावी म्हणून ईव्हीएम मतदान यंत्र जनजागृती अभियानाच्या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशान्वये एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व गुप्त आणि सुरक्षित निवडणुकीचे आधुनिक तंत्र कशा पद्धतीने हाताळले जाते, त्याचे प्रात्यक्षिक पारोळा येथे रविवारी आठवडे बाजार असल्याने विविध चौक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आले.
मतदान जागृती करून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट याबाबत प्रात्यक्षिक देऊन नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. यात बहुसंख्य नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशी असते, ती स्वतः करून खात्री केली. यासाठी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, मंडळ अधिकारी तथा शहर तलाठी निशिकांत माने, पोलिस निरीक्षक सुनील पवार, तलाठी बी. एस. बाविस्कर, कैलास माळी, एम. आर. बोपचे, प्रशांत निकम, पोलीस कॉन्स्टेबल हेमचंद्र साबे यांनी सहकार्य केले.