पावसाचा जोर कायम; आज ‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। गणेश चतुर्थी पासून पुन्हा पाऊस परतला आहे. नागपूरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला तसेच नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाला. आज मध्य महाराष्ट्र आणि इतर भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

महाराष्ट्र राज्यातील ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.