फसवणूक : जळगावात कर्जाचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला लुटले ; जिल्हा पेठ पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव :  बँक गॅरंटी काढून त्यावर ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देतो, अशी बतावणी करीत सात जणांनी येथील व्यापाऱ्याची ७७ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवार, ५ रोजी संध्याकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सात जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला.

बँक गॅरंटीची दिली हमी नामदेव पौलाद पाटील (वय ५४, रा. हायवेदर्शन कॉलनी) यांची गुरुकृपा इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते बिल्डरशीप तसेच ऑईल उत्पादक कृषी विषयी व्यवसाय करतात. जून २०२१ मध्ये त्यांचे मित्र रवींद्र सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांची ताराचंद बेनीवाल, कौशिक भट्टाचार्य (रा. कोलकता) यांच्याशी ओळख झाली. अधिकृत नॉन बँकींग फायनान्स बँक गॅरंटी काढून त्यावर ग्राहकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम करतो, याकामाच्या मोबदल्यात आपण पच टक्के कमिशन घेतो, अशी बतावणी कौशिक भट्टाचार्य यांनी केली. व्यवसायासाठी पैश्यांची गरज भासत असल्याने नामदेव पाटील यांनी आपल्याला कर्ज हवे, असा त्याच्या समोर प्रस्ताव ठेवला. १० कोटी ७५ लाख रुपयांची बँक गॅरंटी मिळवून देण्याची हमी देत त्याचे ९० टक्के रक्कम कर्ज म्हणून देण्याचे भट्टाचार्य व पाटील यांच्यात निश्चित झाले. त्यानुसार नामदेव पाटील यांच्यासह त्यांनी त्यांचा मुलगा, पत्नीच्या नावे कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे त्याच्याकडे दिली. काही महिने लोटल्यानंतर १० कोटी ७५ लाख रुपयांची बँक गॅरंटी ईमलव्दारे पाटील यांना मिळाले. या गॅरंटीवर बँक ऑफ बडोदा व्यवस्थापकाची स्वाक्षरी व शिक्का होता. कर्ज प्रकरण मंजूर होत आहे, याची खात्री पाटील यांना झाली. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी आरटीजीएसव्दारे पैसे ट्रान्सपर केले. पाटील यांनी प्रकाश निशादराज यांच्याशी संपर्क साधून कर्जापोटी दिलेली रक्कम परत मिळावी, यासाठी वारंवार संपर्क साधला. संशयितांनी पुन्हा बँक गॅरंटीचे अमिष दाखवून २८ सप्टेंबर २०२१ ते १ मे २०२३ दरम्यान तब्बल ७७ लाख ८ हजार रुपये पाटील यांच्याकडून घेतले. त्यानंतरही पाटील यांना कर्जही मिळाले नाही तसेच त्यांनी दिलेल्या रक्कमेचाही परतावा संशयितांकडून झाला नाही. फसगत झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारीनुसार कौशिक भट्टाचार्य, ताराचंद बेनिवाल (रा. शनिपेठ) प्रकाश निशादाज (रा. जिल्हापेठ), नईम खान, अतुल शर्मा, अभिषेक श्रीवास्तव, आदित्य सिंग यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला.