फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव: शहरातील मुन्सिपल कॉलनी भागात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १८ मे ला सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. अद्याप आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंदनगर जवळील मुन्सिपल कॉलनी येथे पराग ठोंबरे हा त्याचे आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. फोटोग्राफीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शुक्रवारी १७ मे रोजी रात्री परागने कुटुंबासह जेवण केले व झोपला. त्यानंतर मध्यरात्री त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता त्याची आई लताबाई यांच्या लक्षात आले.

मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्याला खाली उतरून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.