जळगाव : मित्र परिवारासह जळगाव : काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रा. दीपक प्रल्हाद पाटील (४३, रा. फुपणी, ता. जळगाव) यांचा बर्फाचा थर निखळून त्याखाली असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २५ में रोजी संध्याकाळी काश्मिरमधील सोनमर्ग येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील फुपणी येथील रहिवासी असलेले दीपक पाटील हे कल्याण येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे. ते पत्नी व मुलीसह कल्याण, धुळे येथील मित्र परिवार असे एकूण १४ जण काश्मिरात फिरायला गेले होते.
शनिवारी संध्याकाळी ते सोनमर्ग येथे बर्फाच्छादीत परिसरात फिरत असताना अचानक बर्फ निखळला.बर्फ निखळल्यानंतर पाटील दाम्पत्य नदीत कोसळले होते, मात्र यात पत्नीला वाचवण्यात यश आले आहे.ही घटना शनिवार, २५ में रोजी संध्याकाळी काश्मिरमधील सोनमर्ग येथे घडली. मयताचे काश्मिरातच शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह फुपणी येथे आणणार आहे.
जळगावातील मदतीने एकाच दिवसात सोपस्कार पूर्ण
काश्मिरमध्ये पाटील यांचा मृत्यू झाल्याने नेमके काय करावे, हे सोबतच्या मंडळींना समजत नव्हते. त्यावेळी बॉर्डर लेस फाउंडेशनच्या माध्यमातून काश्मिर मध्ये आरोग्य सेवेचे काम केलेले जळगावातील डॉ. धर्मेंद्र पाटील यांना या विषयी माहिती मिळताच त्यांनी कंगन येथे सैन्य दलातील मेजर विशाल सागर यांच्याशी संपर्क साधून घटना कळविली. त्यावेळी सैन्य दलातील मंडळी मदतीसाठी धावले व त्यांनी सर्व वैद्यकीय व अन्य मदत करत मृतदेह श्रीनगरपर्यंत पोहोचविला.
जाण्यापूर्वीच अडथळे
दीपक पाटील हे प्रथमच पर्यटनाला गेले. तसेच काश्मीरला जाण्याचे नियोजन असताना त्यांची निवडणूक ड्युटी लागली. त्यानंतर जायचे ठरवले त्या वेळी रेल्वेचे तिकीट मिळाले नाही म्हणून विमानाने जाण्याचे ठरवले. मात्र त्या वेळीही सकाळच्या विमानाचे तिकीट मिळाले नाही म्हणून ते संध्याकाळच्या विमानाने गेले