पुणे : जून महिना संपत आला असला तरी मान्सून काही येण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांसह शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अशातच आता हवामान खात्याकडून पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या 22 जून रोजी मुंबईत मध्यम आणि 23 आणि 24 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील चार दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
केरळ आणि कर्नाटकच्या किनार्यावर दक्षिण-पश्चिम वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. अरबी समुद्रात मान्सून सक्रीय होण्याच्या द्दष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. कर्नाटक, केरळच्या किनाऱ्यावर पुन्हा ढगांची दाटी दिसून येत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याप्रमाण राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये येत्या तीन दिवसात पावसाची शक्यता आहे. तर राज्यात 23 आणि 24 जूनला पाऊस होईल. विदर्भात मध्यम स्वरुपाच्या पाऊस होईल तर 24 जूनला कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मात्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात साधारण पाऊस असेल. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील तीन दिवसाच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.