---Advertisement---
जळगाव । अनेक दिवसाच्या ब्रेक नंतर आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. काल शुक्रवारी जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यानंतर आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.
अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहेत. आज हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कल्याण, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाताना काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोर्ट घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. ब्रेकनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.