जळगाव : प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव कारने जबर धडक दिली. यामुळे रिक्षा उलटून रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. आस्माबी शेख मंजूर असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून एमएच १९ बीयू ५८४३ क्रमांकाचा प्रवासी रिक्षा कलर घेवून बुधवारी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ इए ५१०९) क्रमांकाच्या कारने रिक्षाला जबर धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडली.
कारने दिलेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत असलेली इतर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्र्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात रिक्षातील जुबेर शेख मेहबुब शेख (वय ४०), करीम बेग शरीफ बेग (वय २९), शेख सादीक शेख इसार (४०) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.