जळगाव : भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना कुसुंबा येथे गुरूवार ४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव प्रशांत कुदळे ( २२ रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील तुळजाई नगरात प्रवण कुदळे हा तरूण आई वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. शहरातील बॅनर लावण्याचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. चार दिवसांपुर्वीच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. त्यामुळे त्यांचे काका राहूल वसंत कुदळे हे बहिणीला घेवून कुसुंबा आले होते. बुधवार ३ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता प्रणव कुदळे हा त्यांच्या काकांना रेल्वेस्टेशन येथे सोडले. त्यानंतर परत घरी जाण्यांसाठी तो निघाला होता. गुरूवार ४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची वार्ता कळताच आई वडील आणि बहिण यांनी एक आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई प्रिया, वडील प्रशांत कुदळे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.