महापौर, विरोधी पक्षनेत्यांचा ग्रामीण दौरा ‘खेळी की तयारी’

भटेश्‍वर वाणी

जळगाव : येथील महापौर, विरोधी पक्षनेते यांनी दुसर्‍यांदा ग्रामीण मतदारसंघात दौरा करून गाठीभेटी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनील महाजन हे माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने भविष्यात राष्ट्रवादीमार्फत विधान परिषदेची किंवा ग्रामीण मतदारसंघातून या पक्षामार्फतच निवडणूक लढविण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात चर्चिली जात आहे.

विधान परिषदेसाठी अनेक जण बाशिंग बांधून

जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक जण बाशिंग बांधून आहेत. त्याचप्रमाणे काही जणांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. महापौर पती व मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे आगामी निवडणुकांसाठी इच्छुक असल्याचे त्याच्या समर्थकांकडून बोलले जात असते.

खडसे यांचे समर्थक

सुनील महाजन हे शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) असले तरी ते अनेक वर्षांपासून एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. खडसे यांना ते नेहमी भेटत असतात. राष्ट्रवादीचा विचार करता सद्य:स्थितीत या पक्षात सरळ दोन ते तीन गट दिसून येतात. यात भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या खडसे यांना राज्यपातळीवर कितीही मान असला तरी जिल्ह्यातील अन्य गट त्यांच्या नेतृत्वाला छुपा विरोध करीत असतात. यात प्रामुख्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या गटाकडून खडसे यांना छुपा विरोध होत असतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुनील महाजन हे राष्ट्रवादीचा आधार घेऊ शकतात. खडसे गटाकडून देवकर व बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शह देण्यासाठी महाजन यांना पुढे केले जाऊ शकते. कारण या मतदारसंघात लेवा पाटील मतदारही मोठ्या प्रमाणात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर अत्तरदे यांना दोन नंबरची मते मिळाली होती. त्यामुळे सुनील महाजन यांना पुढे केले जाऊ शकते. त्यामुळेच चाचपणीचा एक भाग म्हणून ग्रामीण मतदारसंघात संपर्क अभियान त्यांनी सुरू केल्याची चर्चा माध्यमांवर सुरू आहे. तसेच त्यापूर्वी या वर्षाच्या अखेर होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ते इच्छूक असल्याचेही बोलले जाते. त्या दृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

नेमके कोणत्या पक्षात संभ्रम

महाजन हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असल्याचे सांगितले जाते, मात्र ते नेहमी बसत असलेल्या महापौरांच्या दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो समोरच लावलेला आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून काही जण दबकत नाराजीही व्यक्त करीत असतात. महापौर व विरोधी पक्षनेते नेमके कोणत्या पक्षात असा संभ्रम या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

शहर मतदारसंघात अडचणी

सुनील महाजन हे पूर्वी शहर मतदारसंघासाठी इच्छुक होते. मात्र या मतदारसंघात असलेल्या समस्यांमुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. महापौरपद व विरोधी पक्षनेते पद एकाच घरात असताना कामे शून्य अशी स्थिती असल्याने प्रचंड नाराजी दिसून येते. याचा आगामी काळात फटका बसू शकतो; हे लक्षात घेऊन त्यांनी आपला मोर्चा ग्रामीणकडे वळविला असावा, असेही बोलले जात आहे.