जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होत आहेत. बुधवार, २८ रोजी खड्ड्यातून दुचाकी उधळून मागून आलेल्या टँकरने चिरडल्याने विवाहितेसह १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; तर सोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांसह ‘मविआ’तर्फे आज शुक्रवारी खोटे नगर, तरसोद आणि आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांचा अवजड वाहनांना फारसा धाेका नाही. मात्र, दुचाकी खड्ड्यात गेली तर चालकाचा संपूर्ण तोल जाऊन हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत.
यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांसह शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटातर्फे आज शुक्रवारी खोटे नगर, तरसोद आणि आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन दिवसात जर प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले नाही तर आम्ही जेसीबीच्या साह्याने हे सगळे रस्ते खोदून काढू व वाहतूक बंद करू असा इशारा देण्यात आला.
शिवाय, निष्पाप जनतेचे बळी बंद करा, NHAI अधिकारी जागे व्हा, राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा, असे फलक हातातून घेऊन घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटातर्फे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.