मुंबई : मिचॉन्ग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला असला तरी, महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यानंतर थंडीची लाट आणखी तीव्र होणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली.उत्तर भारतात थंडी वाढलेली आहे, तर दक्षिण भारतात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. पूर्वेकडील भागात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे. देशभरात १५ डिसेंबरपासून थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे.
आसाम, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. बिहार, राजस्थान, झारखंड भागात पारा आणखी घसरणार आहे. राजधानी दिल्लीत आठवडाभर दाट धुके आणि थंडी पडण्याचा अंदाज आहे.विदर्भ आणि कोकणात रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तिथेच, डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे.