जळगाव : सोन्याची मंगलपोत पर्समध्ये ठेवली. ही पर्स एका बॅगमध्ये ठेवून महिला सराफ बाजारात जाण्यास निघाली. चोरट्याने ब्लेडने बॅग चिरत पर्ससह एक लाखाहून अधिक किमतीची सोन्याची पोत लांबविली. दुसऱ्या महिलेच्या पिशवीत असलेली ३० हजाराची रोकड चोरट्याने लांबविली. शनिवार, १३ रोजी दुपारी टॉवर चौक परिसरात फुले मार्केट आसोदा रोडवर हा प्रकार घडला.
शहरात वास्तव्यास असलेल्या महिलेची सोन्याची पोत तुटली होती. त्यामुळे ही पोत सराफाकडे नेण्यासाठी महिलेने एका लहान पर्समध्ये ठेवली. त्यानंतर ही पर्स एका बॅगमध्ये घेत मुलगा तसेच एका तरुणीला सोबत घेत दुपारी टॉवर चौकात आले. सराफ बाजारात जाण्यासाठी पायी चालत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने ब्लेडने चिरा पाडत सोन्याची पोत असलेली पर्स लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने शहर पोलीस ठाणे गाठले व कैफियत मांडली. दुसरी महिला चणे, फुटाणे विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
माल विक्री झाल्याने नवा माल घेण्यासाठी महिलेने घरातील रोकड व माल विकलेले पैसे असे एकूण ३० हजाराची रोकड पिशवीत भरुन टॉवर चौकात आली. ही महिला पायी चालत जात असताना भामट्याने त्यांच्या पिशवीतील ३० हजाराची रोकड अलगत काढून घेत पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आली. पैसे लांबविल्याची तक्रार केली. या दोन्ही घटनांची दखल घेत महिला पोलीस तसेच पोलीस कर्मचारी तत्काळ दोन्ही तक्रारदार महिलांना सोबत घेत स्पॉटकडे खाना झाले