मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ; आगामी चार दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस

जळगाव/पुणे । उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना हवामान खात्याकडून दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मात्र त्यापूर्वी राज्यात वरुणराजा जोरदार हजेरी लावणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आजपासून पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावात जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घसरण झालीय आहे. यातच जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे घामांच्या धारांनी वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. आजपासून पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी गारांचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अल्रर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.