जळगाव : मुलाच्या वाढदिवस साजरा करण्याची कुटुंबात तयारी सुरू होती. त्यानुसार पतीसह पत्नीने गुरुव्दारात जावून मुलाच्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर आराम करतो, असा आईला निरोप देत दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या मुलाच्या पित्याने गळफास घेत आत्महत्या केली. अमित नंदलाल कटारिया असे मृताचे नाव आहे. गुरुवार, ९ रोजी ही घटना सिंधी कॉलनी परिसरात घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला.
अमित कटारिया हे व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचे शहरातील सेंट्रल फुले मार्केटमध्ये चुनरी, ओढणी तसेच सौदर्य प्रसाधने विक्रीचे दुकान आहे. निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, अमित कटारिया गेल्या काही दिवसापासून मानसिकदृष्ट्या खचले होते. मात्र ते कोणाजवळ व्यक्त होत नव्हते.गुरुवारी त्यांचा तीन वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. यानिमित्त ते पत्नीला सोबत घेत शहरात गुरुव्दारात आले. मुलाच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर हे दांम्पत्य घरी आले. घरात मुलाच्या वाढदिवसाची तयारी सुरु होती.
मी आराम करतो, असा आईला निरोप देत अमित हे वरच्या मजल्यावरील घरात खाना झाले. त्यानंतर त्यांनी ओढणीचा गळ्याला फास घेत छताच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळेनंतर आईने त्यांचा मुलगा अमित याला आवाज दिला. दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोकला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारील व्यक्तींनी धाव घेतली. व दरवाजा उघडला असता प्रकार समोर आला.
दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. पोलीस कॉन्सटेबल संदीप पाटील यांनी पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे अनेक व्यावसायिक भयग्रस्त झाले आहेत. या काळजीतून अमित हे मानसिकरित्या खचले होते. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. शासन व मनपा प्रशासनाने गाळेधारकांचा विषयात लक्ष घालावे, अशी भावना अशोक मंधान यांनी रुग्णालयात व्यक्त केली.