मोठी बातमी! पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर गॅस टँकरचा स्फोट, एक किलोमीटरपर्यंत स्फोटाचे प्रतिध्वनी

पुणे : महाराष्ट्रातील पुण्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावर गॅस टँकरमध्ये स्फोट झाला आहे. चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला आणि अनेक घरे कोसळली. मोहितेवाडी परिसरात रविवारी पहाटे हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. मात्र, घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. टँकरचा स्फोट झाल्याने परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांनी पेट घेतला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. टँकरमधून गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

स्फोटाचे धक्के एक किलोमीटर दूरपर्यंत जाणवले
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील मोहितेवाडी परिसरात खाद्यपदार्थांचा ढाबा आहे. या ढाब्यावर नेहमीच रहदारी असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर गॅस टँकर उभा असताना अचानक या टँकरने पेट घेतला. काही वेळातच गॅस टँकरचा स्फोट झाला. या स्फोटाचे धक्के एक किलोमीटर दूरपर्यंत जाणवले. कर्णकर्कश आवाजाने नागरिक भयभीत झाले.

गॅस टँकरचा स्फोट झाल्याने रस्त्यालगतच्या अनेक घरांच्या खिडक्या तुटल्या. काही घरांचीही पडझड झाली. मात्र, सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. याआधी गेल्या वर्षी पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका टँकरसह पार्क केलेल्या 4 बसेसला आग आणि भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.