मुंबई : राज्यभरात सोमवार पासून पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातील काही भागात पावसामुळे तापमानात घट झाली आहे. २३ जानेवारीपासून उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सध्या थंडीपासून फारसा दिलासा नाही. नाशिक, जळगाव, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २५ जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.