जळगावः जागतिक स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची गरज आहे, त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ४ लाख युवक व युवतींना तांत्रिक कौशल्य व जर्मन भाषा विद्यापीठ स्तरावर शिकवून प्रशिक्षित केले जातील. या योजनेचा पहिला टप्पा मे २०२४ पासून सुरू करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी ९ रोजी शहरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या मुली व मुलांच्या वसतिगृहातील व्यायाम शाळा व खुल्या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शासकीय तंत्रनिकेतनमधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नाश्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायामशाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना ना. चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. स्वच्छता, योग व महिला सक्षमीकरण या तीन गोष्टींवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर आहे. त्यानुसार राज्य शासन योजना राबवित आहे. तंत्रनिकेतनमधील प्रत्येक वसतिगृहात व्यायामशाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,
अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण नाशिक विभागाचे सहसंचालक डॉ.जी.व्ही. गर्जे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य शासकीय डॉ. पराग पाटील, अभियांत्रिकीचे प्राचार्य एस. आर. गाजरे, मुलांच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ. एस.एन. शेळके, मुलींच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ. आर. डी. गोसावी, डॉ. अमृता कोतकर व विभागप्रमुख उपस्थित होते