पुणे : पहाटेपासून उन्हें वर येईपर्यंत थंडीचा असा गारठा की स्वेटर, मफलर गरजेचे आणि लगेच दुपारपासून रणरणते ऊन. यात भरीस भर म्हणून अवकाळीचा फटका म्हणजे गारपिट आणि मुसळधार पावसाची चिन्हे. हे सध्या राज्यातील हवामानाचे संभ्रमित करणारे दृश्य आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल.
राज्यात कोकण वगळता काही भागांत तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसासोबत गारपीट होण्याचीही शक्यता आहे. मुंबई, पुण्यात कोरडे हवामान पाहायला मिळेल, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. परिणामी शेती धोक्यात येऊ शकते.