जळगाव: जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात १०६९ व ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असतील. कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या १५०० च्या वर आहे.गेल्या वर्षभरात जिल्हयात राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ३४ हजार ६०९ मतदार वाढले आहेत. जिल्ह्यात एकूण ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. ही अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.
जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीला ही यादी ग्राह्य असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या पुरुष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. ३४ हजार ६०९ मतदार वाढले आहेत. त्यात महिला २१ हजार ८८० तर पुरुष मतदार १२ हजार ७१७ आणि, तृतीय पंथीय मतदार १२ वाढले आहेत. नवमतदार (१८ ते १९ वय) १० हजार ५७१ वाढले आहेत. २० ते २९ वयोगटातील १ हजार ४२६ मतदारांची घट, दिव्यांग २८१ घट तर ८० वयोगटावरील ९ हजार ७३३ एवढी घट झाली आहे.