सावदा : रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या सावदा उपबाजार समिती आवारात नव्याने व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे. या संकुलासाठी खोदलेल्या खड्यात सावदा येथील धान्याचे व्यापारी जगन प्रेमचंद नेमाडे मोटरसायकलसह पडून गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता घडली. जगन नेमाडे यांच्या छातीच्या बरगड्या फॅक्चर झाल्या असून व हाताला मुक्का मार लागला आहे. त्यांच्यावर डॉ. पिंपळे यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहे.
यावेळी सावदाउपबाजार समितीत मोठ्या प्रमाणावर नागरिक गोळा झाले.शॉपिंगला शेतकऱ्यांचा विरोधसावद्यात नव्याने व्यापारी संकुलाचे बांधकाम होत असून या जागेवर कोणतीही सुरक्षा साधनांची तजवीज न करता हे काम सुरू केल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने नेमाडे हे व्यापारी थोडक्यात बचावले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी रितेश पाटील यांनी केली आहे.
दरम्यान. आधीच बाजार समिती आवारातील अर्धी जागा ही पणन महासंघाला कोल्ड स्टोरेजसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ९९ वर्षाच्या करारावर दिली असल्याने गुरांच्या बाजारावर परिणाम झाला आहे. बाजार समितीत जागेअभावी गुरांना बाहेर थांबवून व्यवहार करावे लागत आहे. त्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत्यास अत्यल्प जागा शिल्लक राहील व परिणामी गुरांच्या बाजारावर मोठा परिणाम होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या शॉपिंग कॉम्प्लेक्सला विरोध दर्शवला आहे. संबंधित बांधकाम ठेकेदारास नोटीस बजावली असल्याचे समजते.