मुंबईः शेतकऱ्यांनो, यंदाचा मान्सून जरासा उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने विलंबाने मान्सून दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. २२ मे रोजी दरवर्षी मान्सून देशात दाखल होतो आणि १ जून रोजी केरळमध्ये येतो. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे २२ मेची तारीख हुकणार आहे. केरळमध्ये नेमका कधी येणार, याबद्दल निश्चितता नाही. मागच्या वर्षी १ जूनच्या ऐवजी ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता.
यावर्षी ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होणार होईल तर ७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल, असं स्कायमेटने सांगितलं आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनची गती धिमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य सल्ला घेऊनच पीकपेऱ्याचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.