शेळगाव मध्यम प्रकल्पातून २५ हजार एकर जमीन सिंचनाखाली : आ. एकनाथ खडसे

जळगाव :  शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातून २५ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच मासेमारी व पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी ६ रोजी दिली. शेळगाव बॅरेजची त्यांनी माध्यम प्रतिनिधींसह पाहणी केली, त्यावेळी त्यांनी या प्रकल्प निर्मितीची सविस्तर माहिती दिली. १९९८ मध्ये या प्रकल्पाची किंमत १९८ कोटी होती. मीच त्याचे भूमिपूजन केले. तेव्हा याठिकाणी धरण करायचे हे सांगितले असता कोणाला ते पटले नव्हते. कारण येथे सर्वत्र जंगल होते. प्रत्यक्षात १९९९ मध्ये ट्रेंडर देऊन या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. प्रकल्पात १२ टीएमसी पाणी थांबेल. यातून मोठे क्षेत्र ओलीताखाली येईल, असा विश्वास आ. खडसे यांनी व्यक्त केला.

तापी खोरे संकल्पनेतून प्रकाशा बॅरेज, सारंगखेडा बॅरजे, सुरवाडा बॅरेज साकार झाले. अमळनेर तालुक्यात पाडळसे धरण आहे. त्यामुळे बॅकवॉटरचा स्त्रोत थेट शेळगाव व हतनूर धरणापर्यंत असणार आहे. याचा परिणाम २२५ किलोमीटरपर्यत पाणी तापी नदीत थांबणार आहे. परिणामी बाराही महिने पाणी राहिल. आजुबाजुच्या क्षेत्रात पाण्याची पातळी वर येईल, असे त्यांनी सांगितले. बळीराजा योजेनेमुळे केंद्रातून निधी उपलब्ध झाला. या योजनेत पाडळसे धरणाचा समावेश झाला. यामुळे धरणाच्या कामाला गती येईल, असा विश्वास आमदार खडसे यांनी व्यक्त केला.