समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार

मालेगाव:  २७ जानेवारी समृद्धी महामार्गावर २६ जानेवारी रोजी १०.३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. पुणे येथून नागपूरकडे जाणाऱ्या एनआय ०१ एडी ३३९१ क्रमांकाच्या कंटेनरला नेक्सोन एमएच १२ एसआय ९४८८ या चारचाकी वाहनाने पाठीमागून जबर धडक दिली.

यात नेक्सोन चारचाकी वाहनातील शकील पठाण (२८) याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनिकेत जाधव (२५) रा. पुणे हा गंभीर जखमी झाला.जखमीला रुग्णवाहिके द्वारे उपचारासाठी वाशीम येथे दाखल करण्यात आले. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती स्थिर  असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिस उपनिरीक्षक राहुल गधे, कॉन्स्टेबल विजय डोईफोडे, सुनील भुरकाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास मालेगाव पोलिस करीत आहे.