जळगाव : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला असून यामुळे उभी पिके पाण्याखाली आल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वीज पडून ३५ वर्षीय आनंद सुरेश कोळी या शेतमजुराचा गुरुवारी साडे तीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला तर कोळी यांच्या सोबत असलेल्या पत्नी, दोन मुले आणि सासू यांना देखील विजेचा धक्का बसल्याने दुखापत झाली आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. कपाशीसह विविध पिकांचे यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यागत परिस्थिती अनेक भागात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक भागात जोरदार पावसाने नदी नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यात या पावसामुळे तितूर व डोंगरी नदीला मोठा पूर आला असून शहरातील पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे.
शेत मजुराचा मृत्यू
अमळनेर तालुक्यात झालेल्या दुर्घटनेत मयत आनंद हा शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रहिवासी तर मांडळ येथील जावई होता तो पत्नी प्रतिभा आणि दोन मुलासंह गेल्या दहा वर्षांपासून मांडळ येथे राहत होता. ६ रोजी सासू लटकनबाई कोळी यांच्या शेतात ते भुईमूगाच्या शेंगा काढण्यास गेले होते दरम्यान दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरू झाल्याने आनंद त्याची पत्नी प्रतिभा मोठा मुलगा राज, लहान मुलगा प्रशांत आणि सासू यांनी लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला त्यावेळी जोरात वीज कडाडली आणि झाडावर पडली,त्यात आनंद याना विजेचा जोरात शॉक लागला त्यात त्याचा जागेवरच मृत्यु झाला तर पत्नी ,सासू आणि मोठा मुलगा राज याना देखील विजेचा धक्का बसला,त्यांना मांडळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शुभम पाटील आणि डॉ. नीलेश जाधव यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविले १०२ ने भूषण कोळी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ जी. एम.पाटील यांनी आनंद याचे शवविच्छेदन केले व जखमींवर उपचार केले.