धरणगाव : जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या कारचा स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळली. यात राज महेंद्र शिरसाठ (वय १९, रा. सार्वे, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, ४ एप्रिल रोजी मुसळी ते चिंचपुरा दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील किर्तनकार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ५ रोजी राज शिरसाठ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील सार्वे गावात राज शिरसाठ हा आपल्या आई आणि आजी, आजोबांसोबत वास्तव्याला होता. राज हा धरणाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गुरूवार, ४ एप्रिल रोजी दुपारी राज शिरसाठ हा त्यांच्याच गावातील किर्तनकार सुरेश अशोक अहिरे (सार्वेकर महाराज) यांच्यासोबत त्यांच्या (एम.एच. ०९ डी.एक्स. ८९९१) क्रमांकाच्या कारने काही कामानिमित्त जळगावला येण्यासाठी निघाले आणि दुर्घटना घडली.
भरधाव वेगाने जात असलेली कार झाडावर आदळल्याने कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला होता. या अपघातात कारमध्ये बसलेला राज शिरसाठ या तरुणाला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील सार्वेकर महाराज हे देखील गंभीर जखमी झाले.