महाराष्ट्र : हा निर्णय आपला वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, चव्हाण १५ फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. यानंतर चव्हाण यांनी माध्यमांसमोर येऊन आपले मत मांडले. अशोक चव्हाण म्हणाले की, मी माझा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे, हा माझा स्वतःचा निर्णय आहे.
मी कोणत्याही आमदाराशी बोललो नाही
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र अशोक चव्हाण यांनी ती फेटाळून लावली. ते म्हणाले की, मी अद्याप कोणत्याही आमदाराशी बोललो नाही. ना मी कुठल्या पक्षात प्रवेश केला आहे ना कुठे जायचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय माझा आहे.