जळगाव: शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता आणि भीती निर्माण झाली आहे. सायबर ठग आणि ऑनलाइन दरोडेखोर लोकांचे लक्ष नेहमीच आपल्या आर्थिक व्यवहारांवर असते. ते सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर २४ तास सक्रिय झाले आहेत. जिल्ह्यात यावल, जळगाव शहरात सायबर ठगांनी फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत.
सायबर ठगांनी अमळनेर शहरातील एका तरुणाचा मोबाईल हॅक करून, ओटीपीच्या माध्यमातून त्याच्या बँक खात्यातून १ लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ७ जानेवारी रोजी घडला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात मोबाईलधारकाविरोधांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भावेश गणेश पाठक (वय ३२, शिवशक्ती चौक, अमळनेर) येथे परिवारासह राहतो. तो पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. त्याला ७ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता मोबाईलवर अनेक मॅसेज मिळाले. त्यात अज्ञात व्यक्तीने त्याचा मोबाईल हॅक करून आलेल्या ओटीपीच्या मदतीने त्याच्या बँक खात्यातून १ लाख रूपये काढले होते.
भावेशला याबाबत कळल्यावर त्याने तत्काळ बँकेत जाऊन त्याचे खाते फ्रीझ केले. त्यानंतर तो अमळनेर पोलीस ठाण्यात गेला आणि तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
हा प्रकार मोबाईल हॅकिंग आणि ओटीपी फसवणुकीचा एक उदाहरण ठरला आहे, जो नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता दर्शवतो.