जळगाव जिल्ह्यात १ लाख तडीरामांची मौज, मिळाला मद्य परवाना

जळगाव : नववर्ष स्वागतासाठी विविध ठिकाणी पार्ट्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यात काही पार्टीमध्ये मद्य प्राशन केले जाते. पोलीस प्रशासनातर्फे मद्य प्राशन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत असतो. या कारवाईपासून वाचण्यासाठी मद्य प्रेमी अधिकृत परवाना घेत असतात. यावर्षी जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे एक  लाख नागरिकांना एक दिवसीय दिवसीय मद्य प्राशन करण्याचे परवाने वितरित केले आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, ढाबे, कॅफे आदी ठिकाणी मौजमजा करतात. तर काहीजण घरी किंवा शेतात थर्टी फस्ट सेलिब्रेशन करणार आहेत. दरम्यान, पार्टी करण्यासोबत अनेकजण अवैधपणे मद्य प्राशन करत गोंधळ देखील घालत असतात. अशांवर पोलिसांची नजर राहणार आहे. मात्र, थर्टी फर्स्टला दारू पिण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली असून एका दिवसासाठी परवानगी देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात परमिट रूम बियर बारची संख्या ५९५ आहे. तसेच ३४ वाईन शॉप व १४६ बिअर शॉपी आहेत.  येथे पिणाऱ्यांची गर्दी  होत असते. परंतु, अवैध मद्य विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची नजर करडी नजर राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासोबत अवैध मद्य विक्री व बनावट दारू रोखण्यासाठी पथक नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक अवैध मद्य विक्री व बनावट दारु रोखण्याची कारवाई करणार आहे.

शासनाने मद्य विक्रीसाठी निर्धारित वेळ ठरविला आहे. याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.  तर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या ढाब्यांवर मद्य प्राशन न करता परमिट रूम, बियर बार या ठिकाणी मद्यप्राशन करण्याचे आवाहन अधीक्षकांनी केले आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज असून कारवाईसाठी जिल्ह्यात कर्मचारी तसेच पथक नियुक्त करण्यात आले आहेत.