जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीच्या विकासासाठी तात्काळ सूचना देण्यात येतील, शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मंगळवारी जळगावात करण्यात आला. सागर पार्क मैदानावर आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना चांदा ते बांदा लोकप्रिय झाली म्हणून विरोधकांचा वांधा झाला आहे. सरकार आज पडेल, उद्या पडेल असे म्हणत होते मात्र आज २ वर्ष झाले सरकार सुरळीत सुरु आहे. महिलांसाठी आणलेल्या योजना पाहून विरोधक घाबरले आहेत. दि.१७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात २ महिन्याचे पैसे जमा होणार म्हणजे होणारच. सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात येतील, त्यामुळे काळजी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.
बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी ही योजना
‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर’ हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंचे काव्य आहे. संपूर्ण जगणं ‘आयुष्य’ बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलं. बहिणाबाईंच्या हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना’ आणली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.