106 निराधारांची रोज भागवली जातेय भूक

तरुण भारत लाईव्ह । रवींद्र मोराणकर । जळगाव, ज्यांचं कोणी नाही अशा शहरातील 106 निराधारांना ‘ते’ रोज विनामूल्य डबे पुरवतात. चार वर्षांपूर्वी 20-22 जणांपासून सुरुवात केलेला हा समाजोपयी उपक्रम आज विस्तारला आहे. यातून मिळणारे समाधान हे शब्दाच्याही पलीकडले आहे, असा अनुभव ‘बॉक्स ऑफ हेल्प’च्या संस्थापक अध्यक्षा सुधा पुरुषोत्तम काबरा सांगतात.

आईच्या समस्यांनी लावले कामाला
नववर्षाच्या पूर्वसंध्येला 56 वर्षीय सुधा काबरा आपला अनुभव सांगत होत्या. त्या म्हणाल्या, माझी आई एकटी राहते. तिच्या समस्या पाहून डोक्यात कल्पना सुचली की, माझ्या आईला एवढा त्रास आहे तर इतर ज्येष्ठांना किती त्रास होेत असेल? यातूनच ‘बॉक्स ऑफ हेल्प’च्या माध्यमातून विनामूल्य डबे पुरविण्याचा उपक्रम चार वर्षांपूर्वी सुरू झाला. 19 फेब्रुवारीला आईचा वाढदिवस होता. त्या दिवसापासूनच हा उपक्रम सुरू केला.

डबे सुरू करण्याआधी होते पडताळणी
20-22 डब्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आज 106 जणांना डबे घरोघर पोहोचविले जातात. जे ज्येष्ठ काही करू शकत नाही आणि ज्यांची मुलं त्यांनाही विचारत नाही, वयोमानानुसार ते कामही करू शकत नाही, मुलांनी त्यांना घरातून काढून टाकलं आहे, अशा निराधार लोकांना दोन्ही वेळेचे डबे पुरवतो. डबे सुरू करण्याआधी संस्थेचे सदस्य त्यांची खात्री करतात. ही पडताळणी करताना थेट ज्येष्ठांना न कळविता शेजारी-पाजारी विचारून खात्री करतो. अशांना आम्ही कार्ड बनवून देतो. मग डबे सुरू करतो.

गणेश कॉलनीतील बाबा झाले होते भावूक…
काल गणेश कॉलनीतील एका ज्येष्ठ नागरिकाचा फोन आला की, मी डोळ्याच्या ऑपरेशनला चाललोय. तुमच्या पाया पडायच्या आहेत, तुमच्या डब्यामुळे मी जिवंत आहे. मी म्हटलं, बाबा, असं काही नाही. तुमचं वय आहे, तोपर्यंत तुम्ही राहणार आहेत. डबा देणं हे फक्त एक निमित्त आहे.

कोरोनातही धाडस
कोरोना काळात स्वयंपाकासाठी महिला येत नव्हत्या. ते डब्बे निम्म्यावर आले होते. तेव्हा घरुनच डबे तयार करून पाठवत होते. प्रसंगी मी स्वत:ही जात होते. अशाही परिस्थितीत 50-60 जणांना डबे पोहोचविण्याचे धाडस केले. तोही अनुभव पाठिशी आहे, असेही सुधा काबरा सांगतात.

सदस्यांच्या योगदानातून चालतो उपक्रम
‘बॉक्स ऑफ हेल्प’चा 20-25 जणांचा ग्रुप आहे. सर्वांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आमच्याकडे साजरे होतात. कोणाचे पुण्यस्मरण असतात. यातून हाच पैसा संस्थेसाठी आम्ही एकत्रित गोळा करतो. काही 2100-2100 रुपये देतात, तर काही मैत्रिणी यासाठी 500-500 किंवा त्यांच्या ऐपतीनुसार देणगी देतात. समाजातील काही दातेही हातभार लावतात. याच पैशातून निराधार ज्येष्ठांना आम्ही घरपोच डबे पुरवतो. पैसा कमी पडला तर प्रसंगी पदरमोडही करतो. ज्यांना समाजातील निराधार, निराश्रीत असलेल्या व्यक्तींची जाणीव आहे, असे या संस्थेचे सेवाभावी सदस्य आहेत. बहुतांश सर्व सदस्य हे पन्नाशीच्या जवळपासच्या वयाचे आहेत, या सर्वांचे योगदान असते, असे सुधा काबरा यांनी सांगितले.