बेसमेंटच्या कारवाईकडे आयुक्तांचीही डोळेझाक?

 

जळगाव : शहरातील जळगाव महानगर पालिका ते शास्त्री टॉवर दरम्यान दुकानदारांच्या बेसमेंटमध्ये असलेल्या पार्किगच्या विषयाकडे मनपा आयुक्तांनीही डोळेझाक केल्याचे चित्र आहे. या विषयावर मोठ्या पदाधिकार्‍यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच यावर मनपा ठोस धोरणा ठरविण्यासाठी आयुक्तांचेही स्पष्ट मत दिसत नाही. यामुळे हा विषय आहे तेथेच थांबून असल्याने पदाधिकार्‍यांना समाधान पण नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.

शहरातील महात्मा गांधी रोडवरील बेसमेंटधारकांचे सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आले होते. यासर्व प्रकियेची कल्पना आयुक्तांना असेलच कारण यावर नगररचना विभागातील कर्मचार्‍यांनी प्रचंड मेहनत घेतली पण या मेहनतीचे फळ पदाधिकारी चाखत असतानाचे चित्र आहे. यावर खराब रस्ते, ठिकठिकाणी पाईप लाईनसाठी झालेले खोदकाम, रस्त्यावरील फपुट्यामुळे होणार त्रास या सर्व त्रासाला भोगणारी जळगावकर जनतेला पदाधिकार्‍यांनंतर अधिकार्‍यांकडूनच मोठी अशा होती.

पण याच अधिकार्‍यांमधील वरिष्ठ अधिकारीच जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर जनतेने दाद मागावी कोणाकडे? कारण दिवसेंदिवस ही समस्या उग्र रूप धारण करत आहे. अशातच पार्किँगच्या समस्येमुळे शहरात उद्भवणार्‍या वादाचे प्रमाणही कमी नाही. असे असतानाच याकडे आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून हे प्रकरण हाताळणे गरजेचे असतानाच त्यांनी याकडे डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. याबाबत माहितीसाठी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीने दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत असल्याचे सांगितले.