नोएडामधील डे-केअर सेंटरमध्ये १५ महिन्यांच्या मुलीला अमानुष मारहाण झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुलीच्या आईला हा सगळा प्रकार समजला तेव्हापासून रडू थांबतच नाहीये. तिने सांगितले की, सीसीटीव्ही पाहिल्यानंतर माझी झोप उडाली आहे, मला आठवडाभरापासून झोप येत नाही.
मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी नवरा मुलीला डे-के अरमध्ये सोडून ऑफिसला गेला. दुपारी १२:३० वाजता ती मुलीला घेण्यासाठी पोहोचली तेव्हा सेंटरचे तीन शिक्षक गेटवर आले आणि म्हणाले की मुलीला चिकनपॉक्स असू शकतात, ती सतत रडत आहे. मुलीला घरी नेलं तेव्हा तिची प्रकृती पाहून आईला संशय आला आणि ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीला कोणीतरी चावले आहे. ही दुखापत कुठे आणि कशी झाली हे ताबडतोब शोधा.
मुलीच्या आईने डे-के अर सेंटरच्या मालकाला विचारले तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला आणि दावा केला की, ही दुखापत घरी किंवा क्लिनिकमध्ये झाली असावी. जेव्हा सीसीटीव्ही फुटेज मागितले गेले तेव्हा तेही अनेक दिवस ते दाखवले गेले नाही. सेंटर व्यवस्थापन आणि काही लोकांनी तिच्यावर गुन्हा दाखल करू नये, यासाठी दबाव आणला.
अखेर अनेक दिवसांच्या दबाव आणि आश्वासनानंतर, पोलिसांच्या उपस्थितीत मुलीच्या आईला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. मुलीच्या आईने सांगितले की, फुटेज पाहून मला खूप मोठा धक्का बसला. त्या आयाने खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझ्या मुलीचा गळा दाबला, तिच्या तोंडात पेन्सिल घातली, मुलीला भिंतीवर आपटले, जमिनीवर फेकले आणि ४५ मिनिटे तिला टॉर्चर केले. ती माझ्या मुलीला खाली आपटत होती.
सेंटर चालकाचे दुर्लक्ष
मुलीच्या आईचा आरोप आहे की, डे केअर सेंटरच्या मालकीण चारू अरोरा यांनी हे सर्व पाहिले पाहिजे होते. परंतु त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. फुटेज पाहिल्यानंतर आईने मुलीचे सीटी स्कॅन केले आहे. मुलीच्या आईने सांगितले की, मला भीती वाटते की, माझी मुलगी दोन महिन्यांपासून तिथे जात होती, कदाचित हे रोजचच होते. फुटेज पाहिल्यानंतर, बाकीचे फुटेज पाहण्याची माझ्यात हिंमत होत नाही. या प्रकरणी आता पोलिस तपास करत आहे.