जानेवारी अखेरपासूनच जिल्ह्यात या वर्षी तापमान ३४ ते ३६ अंशांदरम्यान राहिले. १८ एप्रिल दरम्यान जिल्ह्याच्या सर्व प्रकल्पांत सरासरी ४१.२४ टक्के उपयुक्त जलसाठा होता. शिवाय एप्रिलअखेरीस तापमानाचा पारा तब्बल ४४ ते ४६ अंशावर पोहचल्याने जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली होती. परिणामी मे महिन्याच्या सुरुवातीला ९ गावांसाठी ११ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात वाढ होऊन १३ गावांसाठी १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प असून सद्यस्थितीत हतनूर ३६.००, गिरणा २८.१८ आणि वाघूर ७२.०४ या तीन मोठ्या प्रकल्पात सरासरी ४०.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील हतूनर प्रकल्पावर अमळनेर, चोपडा आदी तालुक्यांच्या सिंचनासह ग्रामीण भागातील पेयजल योजना अवलंबून आहेत. तर जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या गिरणा प्रकल्पावर चाळीसगाव, भडगाव-पाचोन्यासह अन्य ग्रामीण भागातील पेयजल योजनांचा समावेश आहे. वाघूर प्रकल्पावर जळगाव शहरासह अन्य ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
आवर्तन नसल्याने पाणीटंचाई
हतनूर प्रकल्पातून सद्यस्थितीत ८०० क्यूसेकचे चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. तर गिरणा प्रकल्पावर पाच ते सहा तालुक्यांसह २८.१८ टक्के जलसाठा असून या प्रकल्पातून आवश्यकता असूनही चौथे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. परिणामी गिरणा प्रकल्पाच्या आवर्तनावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे.
पाऊस वेळेवर न आल्यास टंचाई बिकट
पाचोरा, भडगाव नगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी गिरणा नदी पात्रात बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांनजीक विहिरी असून आवर्तनानंतर बंधाऱ्यांसह विहिरीत जलसाठा उपलब्ध होऊन त्याद्वारे दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होतो. चाळीसगाव एमआयडीसी, जामदा बंधाऱ्यानजीक जलस्रोत उपलब्ध केला आहे. मात्र आवर्तनाअभावी हा स्रोत आटला आहे. त्यामुळे चाळीसगाव एमआयडीसीला आवर्तनाची आवश्यकता जाणवू लागली आहे. पावसाची वेळेवर सुरुवात झाल्यास टंचाई स्थिती निवारणास मदत होण्याची शक्यता आहे. अन्य परिस्थिती बिकट होण्याचेच संकेत आहेत.
१३ गावांसाठी १५ टँकरने पाणीपुरवठा
चाळीसगाव तालुक्यात पिंपळगाव, राजदेहरे, गावठाण तांडा, कृष्णानगर, अंधारी, हातगाव, विसापूर तांडा व भिल्लवस्ती, अमळनेर- डांगर बुद्रूक, तळवाडे, सबगव्हाण, जानवे, भडगाव- तळवंद तांडा, जामनेर वाडीकिल्ला आणि भुसावळ तालुक्यात कंडारी अशा १३ गावांसाठी १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
गिरणा २८ टक्क्यांवर
हतनूर ३६.००, गिरणा २८.१८, वाघूर ७२.०४, सुकी ७४.५६, अभोरा ६६.९३, मंगरूळ ४३.८६, बहुळा २७.९९, मोर ६६.३१, गूळ ४५.६४, अंजनी २९.४७. शेळगाव बरेज २२.६६, तोंडापूर १८.११ टक्के असा जलसाठा असून मन्याड ११.७७, हिवरा १०.४४, अग्नावती ८.५१ आणि भोकरबारी ०.२० या प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू झाली असून, बोरी प्रकल्पात जलसाठाच नसत्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ३ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ४०.७४, तर १४ मध्यम आणि ९६ लघु प्रकल्पांत सरासरी ३५.५५ टक्के अर्थात १९.३० टीएमसी उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी १६.०७ टीएमसी अर्थात २९.५९ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याची नोंद प्रशासनाकडे होती.
सर्वाधिक टँकर चाळीसगावखालोखाल अमळनेर तालुक्यात
चाळीसगाव तालुक्यात गिरणा, मन्याड प्रकल्पांतून आवर्तन सोडले जाते. तसेच सद्यस्थितीत वस्खेडे-लोंढे प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून पूर्णत्वाकडे आहे. परंतु बराचसा भाग दुष्काळी व अवर्षण प्रवण क्षेत्रांतर्गत असल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवून येते. चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांमध्ये ६ टैंकर तर १२ गावांसाठी १२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.