---Advertisement---
जळगाव : गर्भवती महिलेस रविवारी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सोमवारी प्रकृती खालावल्याचे कारण देत विवाहितेला अन्यत्र हलविण्याचे सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेची प्रसूती झाली. जुळ्या शिशुंना तिने जन्म दिला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र दुपारी विवाहितेचा अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडताच कुटुंबियांना जबर धक्का बसला. माधुरी अक्षय जाधव (वय २४, रा. पहुर कसबे) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
नातेवाईकांच्या माहितीनुसार माधुरी जाधव गर्भवती होती. प्रसुतीसाठी तिला रविवारी (ता. १६, नोव्हेंबर) संध्याकाळी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांनी दाखल केले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार विवाहितेला तातडीने शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात दाखल करण्यात आले. महिलेची येथे सुखरुप प्रसूती झाली. तिने जुळ्या शिशुंना जन्म दिला. दोघांची प्रकृती चांगली असून त्यांना काचेच्या पेटीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. प्रसूतीची सुखद वार्ता कानावर आल्यानंतर कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
सोमवारी (ता. १७ नोव्हेंबर) दुपारी विवाहितेचा रक्तदाब कमी झाल्याने प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास विवाहितेचा मृत्यू झाला. ही वार्ता कळताच पहुर कसबे येथील कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. पहुर कसबे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. आरोग्यदूत पहेलवान शिवाजी पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांकडून माहिती घेतली. तसेच सात्वंन केले. पुढील कारवाईकामी त्यांनी पुढाकार घेतला.
माधुरी जाधव हिचे पती अक्षय जाधव हे पोलीस दलात असून धुळे येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. घटना घडली तेव्हा ते धुळे येथे कर्तव्यावर कार्यरत होते. विवाहितेच्या पश्चात पती, जुळे शिशु, सासू, सासरे, आई, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.
वर्षभरात चौथी घटना
वर्षभरात पहर कसबे गावातील तीन विवाहितांना वेगवेगळ्या तारखेनुसार जळगाव येथे प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी दाखल केले होते. प्रसूती दरम्यान या तीनही विवाहितांचा मृत्यू झाल्याने गावात चिंतेचे वातावरण होते. चौथ्या विवाहितेच्या मृत्युने ग्रामस्थांना जबर धक्का बसला. या घटनेनंतर मागच्या घटनांना ग्रामस्थांकडून उजाळा देत हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन कायदेविषयक पूर्तता केली. विवाहितेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आला. यासंदर्भात चार वाजेपासून पुढील कारवाईची पूर्तता केली जात होती.









