जळगावच्या पर्यटन विकासासाठी २५ कोटींचा निधी; आमदार भोळेंनी दिली माहिती

जळगाव : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत जळगाव शहरातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी 25 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता २०१४ च्या आधी कोणत्याही एका वर्षात जळगाव जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत ८ ते १० कोटींपेक्षा अधिक निधी मिळाला नाही. यानंतर केंद्रात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाले. या दोन्ही सरकारांनी देशात व राज्यात पर्यटन विकासावर भर दिल्याचे दिसून येते. २०१४ नंतर सातत्याने या निधीत वाढ होत गेली. गेल्या दोन वर्षांत तर मंजूर कामांसह प्रशासकीय मान्यता मिळालेली रक्कम, प्राप्त निधीत भरीव वाढ झाल्याचे दिसून येते.

जळगाव शहराच्या  प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या मेहरूण तलाव व गिरणा पंपिंग स्टेशन परिसराचा विकास व्हावा यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर हाण्योसाठी मागणी करून त्यावर सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यावर सकारात्मक निर्णय घेत मंत्री गिरीश महाजन व उद्योगपती अशोक जैन यांच्या सहकार्याने मेहरूण तलाव परिसराचा विकास करणे व गिरणा पंपिंग स्टेशन परिसराचा विकास करणे साठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

गिरीश महाजनांच्या रुपात स्थानिक मंत्र्यांकडे पर्यटन विकासाचे खाते असल्याचा लाभ जळगाव जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत झालेला दिसतो.गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत पर्यटन विकासाच्या निधीत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येते.शहरातील पर्यटन स्थळांची कामे झाल्यामुळे नागरिकांना सुंदर असे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष सहकार्यामुळे मंजुरी झाल्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी त्यांचे आभार मानले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांचेही आमदार सुरेश भोळे यांनी आभार मानले आहे.