नंदुरबार : बँकेतून काढलेली रक्कम घेऊन वाहनाने शासकीय कार्यालयात पोहोचत नाही तोवरच मागावर असलेल्या चोरांनी त्या गाडीची काच फोडून ५० हजार रुपये हातोहात चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ४ एप्रिल रोजी ११.३० वाजता ही घटना घडली. नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात हा सर्व प्रकार घडला.
प्रताप कुमावत हे आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कामानिमित्त नंदुरबार येथे आले. त्यांनी बडोदा बँक शाखेतून काही रोख रक्कम काढून आणली आणि एम.एच.१९-४८६६ या क्रमांकाच्या गाडीत ड्रायव्हर सीटच्या बाजूला बॅगवर ते बंडल ठेवले.
तत्काळ तिथून खामगाव रस्त्यावरील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात येऊन गाडी आवारात लावली आणि भेट घेण्यासाठी कार्यालयात प्रवेश केला. पाच मिनिटात तसेच बाहेर आले. तोपर्यंत चालकाच्या शेजारील सीटजवळील खिडकीची काच पूर्ण फोडलेली आणि सीटवरील ५० हजार रुपयांचे नोटांचे बंडल कोणीतरी काढून नेल्याचे त्यांना आढळून आले.
हा प्रकार कळताच कार्यालयातील सर्व कर्मचारी धावून आले. तथापि, चोरी करणारे नेमके कुठून आले? किती जण होते ? काच फोडल्याचे इतरांना लक्षात कसे आले नाही? हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, कार्यालय आवारात लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून घटनेचा मागोवा घेतला जात असून प्रताप कुमावत यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे
Nandurbar Crime : भरदिवसा गाडीची काच फोडून ५० हजार लांबवले
