नंदुरबार : वीज ग्राहकांना वीजपुरवठ्यासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडवून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा व्हावी अशी मागणी शहर व परिसरातील वीज ग्राहकांनी केली आहे. दरम्यान, शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांच्या कार्यलयास धडक दिली. परंतु, संबंधित अधिकारी जागेवर आढळून आले नसल्याने शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. या रिकाम्या खुर्ची समोर शिष्टमंडळ ठाण मांडून बसले होते.
दरम्यान, सहाय्यक अभियंत्यानी शिष्टमंडळाशी चर्चा करत कार्यकारी अभियंता यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळी आंदोलकांनी आपल्या वीज वितरण कंपनी संदर्भातील समस्या मांडत वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
वारंवार मागणी करुन देखील वीज पुरवठा व त्यासंदर्भातील समस्या सोडविल्या जात नसल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत महिन्याभरापूर्वी वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या होत्या. यानंतर कार्यकारी अभियंता यांनी वीज ग्राहकांना वीज कंपनीच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वसन दिले. मात्र, वीज ग्राहकांच्या वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यासह वीज ग्राहकांना अवास्तव वीज बिल देणे, अंतिम तारखेनंतर वीज बिल पाठवणे, वीज ग्राहकांना दुरुत्तर देणे, सोलर कनेक्शनधारकांना अवास्तव बिल देणे, मीटर जम्पिंग बाबतची समस्या, ट्रांसफार्मर शेतकऱ्यांना स्वतः वाहतूक करण्यास लावणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तसेच दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत आहे. ऐन सणासुदीत वारंवार केबल जळत असल्याच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात आहे.
या प्रकाराने त्रस्त झालेले वीज ग्राहकांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. या शिष्टमंडळात मानव विकास मिशनचे प्रदेश सदस्य अनिल भामरे, जेष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी.पाटील, राकेश पाटील, जयवंत मोरे, संपादक भरत शर्मा, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. एन. के. कुवर, भाजपाचे हितेंद्र वर्मा, मयुरी ग्रुपचे नरेंद्र पाटील, माधव पाटील, देवा बोरसे, अंकुश शिंपी, नरेंद्र खैरनार आदींचा समावेश होता.