जळगाव : घरासमोर पेटवलेल्या शेकोटीत पडल्यामुळे गंभीर भाजलेल्या देवांशू सुनील सोनवणे (वय ८ महिने) या बालकाचा २० जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
नांद्रा खुर्द येथील सुनील सोनवणे व त्यांची पत्नी शेतीकाम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आठ महिन्यांपूर्वीच देवांशू या चिमुकल्याचा जन्म झाला होता. कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरलेल्या या चिमुकल्याच्या मृत्यूने गावकऱ्यांसह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
घटनेचा तपशील
११ जानेवारी रोजी घरासमोर थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवण्यात आली होती. गावातील काही जण शेकोटीजवळ बसले होते. त्याचवेळी देवांशू वॉकरमध्ये खेळत-खेळत शेकोटीजवळ गेला. अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट पेटत्या शेकोटीत पडला. या दुर्घटनेत देवांशूच्या चेहऱ्यापासून पोटापर्यंतचा भाग गंभीर भाजला गेला. तसेच पायालाही गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
मृत्यूने गावावर शोककळा
गंभीर भाजलेल्या देवांशूवर तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, जखमा अतिगंभीर असल्याने २० जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवांशू नांद्रा खुर्दचे माजी सरपंच वासुदेव सोनवणे यांचा पुतण्या होता.
पोलिसांत नोंद
या घटनेबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोनवणे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.