जळगाव : राज्याची विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचाराची सांगता झाली आहे. यातच राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असून जिल्ह्यात राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. त्यांनी यापुढील निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
एकनाथ खडसे यांनी पुढची निवडणूक मी बघेन की नाही हे देवच ठरवेल असे म्हटले आहे. सोशल मीडियावर रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, मी नाथाभाऊ बोलतोय, असे म्हटले आहे. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. मी बरीच वर्षे तुमच्या सोबत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सर्वांनी मला साथ दिली आहे. जात-धर्माचा विचार न करता सर्वांना मदत केली असल्याचे म्हटले आहे.
राज्यात राजकारणात एकनाथ खडसे यांचा मोलाचा वाट आहे. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास १९८७ साली मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाचे सरपंच म्हणून सुरु केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. आमदार, विरोधी पक्षनेते, 12 खात्यांचे मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. त्यांनी अनेकांना पक्षात उभे केले. त्यांच्या शब्दाला गल्लीपासून दिल्लीपर्यत वजन आहे. त्यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते पद देखोल भूषविले आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात १२ खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी २०२० साली भाजप पक्षाला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ते राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत.
व्हिडीओमध्ये ते पुढे म्हणतात की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी पुढची निवडणूक पाहणार की नाही हे देवच ठरवेल.