जळगाव : वाहनामध्ये गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन गंभीररित्या भाजले गेलेल्या रश्मी संजय तेरवडीया (दालवाला) (२३, रा. गणेश पेठ, पुणे ) या तरुणीचा मृत्यू झाला. हा स्फोट मंगळवार, ५ रोजी घडला होता. या अपघातात आतापर्यंत ११ जखमींपैकी ७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दालवाला परिवारातील ५ जण दगावल्याने त्यांच्या परिवारात शोककळा पसरली आहे.
रश्मी तेरवडीया या एका खासगी कंपनीत नोकरीस होत्या. त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणी येत असल्याने संजय तेरवडीया यांनी ग्रहशांती करण्यासाठी नातेवाईकांसह जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अमळनेर येथे धार्मीक विधी करण्यासाठी तेरवडीया व दालवाले कुटुंबिय हे मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी जळगावात आले होते.
संजय तेरवडीया यांचा मुलगा राहुल हा देखील कुटुंबियांसोबत मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येणार होता. मात्र, त्याला सुट्टी मंजूर न झाल्यामुळे त्याचे येणे अचानक रद्द झाले होते. त्यामुळे आई वडीलांसह बहिण हे तिघेच आल्यामुळे राहुल हा या अपघातातून बचावला. वडिलांसह बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे राहुलसह त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वाहन चालकाने ईच्छादेवी चौकी पोलीस चौकशीशेजारील रिफीलींग सेंटवर वाहनात गॅस रिफिलींग करीत असतांना गॅस सिलींडरचा स्फोट होवून तेरवडीया यांच्या कुटुंबातील तिघे, दालवाले कुटुंबातील चौघांसह गॅस भरणारा, वाहन चालक व पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या भाजले गेले होते. यातील ७ जणांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.