Suicide News : महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत संपवली जीवन यात्रा

भुसावळ :  शहरात एका व्यायामशाळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. हा तरुण श्री संत गाडगेबाबा महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षांत शिक्षण घेत होता. या तरुणाचे वडील व्यायामशाळेत आले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा गळफ़ास लावून घेतल्याचे आढळून आले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव करण मनोहर पाटील (वय २१) असे आहे. जुन्या तालुका पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या व्यायामशाळेत करण याने गळफास घेत आत्महत्या केली. करणचे वडील हनुमान व्यायामशाळेत मागील पंधरा वर्षांपासून नित्यनियमाने जात आहेत. रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास व्यायामशाळेत गेले असता त्यांना समोर त्यांच्या मुलाने गळफास  घेतल्याचे दिसून आले. समोरचे दृश्य बघून त्यांना धक्का बसला. करण याला तरुणांनी व परिसरातील नागिरकांनी उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

करण हा महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहत होता. तो शनिवारी हॉस्टेलमधून घरी आला. दुपारी मित्रांसोबत गप्पा मारल्या, तेव्हा हसत खेळत होता. कुठलाही ताणतणाव दिसत नव्हता. अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. तो एकुलता एक होता. घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.