मुलांनी अभ्यासात केलेल्या खराब कामगिरीचा राग आल्याने एका पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओएनजीसीमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याने मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय व्ही चंद्र किशोर काकीनाडा येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मध्ये कर्मचारी आहेत. व्ही. चंद्र किशोर यांना त्यांच्या दोन्ही मुलांच्या अभ्यासातील खराब कामगिरीची काळजी होती आणि भविष्यात ते स्पर्धेला सामोरे जाऊ शकणार नाहीतअशी भीती होती. या चिंतेमुळे त्यांनी दोन्ही मुलांना पाण्याच्या बादलीत बुडवून मारले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये गळफास घेतला. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये मुलांच्या अभ्यासातील खराब कामगिरीची काळजी होती म्हणून हे पाऊल उचलल्याचे आरोपीने सांगितले.
घटनेवेळी त्या व्यक्तीची पत्नी घरात उपस्थित नव्हती. घरी पोहोचल्यावर तिला पतीचा मृतदेह बेडरूमच्या पंख्याला लटकलेला दिसला. त्याचवेळी दोन्ही मुलांचे मृतदेह बादलीजवळ पडलेले होते. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. हर्षवर्धन(८ ) आणि विवेक (५ ) अशी मृत मुलांची नावे आहेत.
बाप न तू वैरी ! पोटच्या दोघ मुलांची केली हत्या,आणि…
