---Advertisement---
विकी जाधव
अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील वाडी चौक परिसरातील सुमारे 150 मतदारांची नावे नदीपलीकडील गायकवाड हायस्कूल येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. परिणामी नागरिकांना जवळपास दोन किलोमीटर अंतरावर मतदानासाठी जावे लागत आहे. आगामी निवडणुकांपूर्वी मूळ मतदान केंद्र पूर्ववत सुरू करावे. संबंधित मतदारांची नावे योग्य यादीत समाविष्ट करण्यात यावेत, अश्या मागणीचे निवेदन स्थानिकांकडून न. पा चे मुखाधिकारी यांच्याकडे देण्यात आले. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील वाडी चौक, गुरव गल्ली, भाजी बाजार, पुजारी गल्ली, लक्ष्मीपुरा अशा घनदाट वस्तीतील सुमारे 150 मतदारांची नावे चुकीने नदीपलीकडील गायकवाड हायस्कूल येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेषतः या भागाचा प्रभाग क्रमांक 10 शी कोणताही सामाजिक वा भौगोलिक संबंध नाही.परिणामी नागरिकांना जवळपास दोन किलोमीटर अंतरावर मतदानासाठी जावे लागत आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांचा समावेश असून, दरवेळी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परिणामी, मतदानाची टक्केवारीही घटत असल्याचे स्थानिकांनी नमूद केले. दरम्यान, वाडी संस्थान परिसरातील मूळ मतदान केंद्र मागील निवडणुकीदरम्यान बांधकामामुळे तात्पुरते मुंदडा हायस्कूल, माळीवाडा येथे हलवण्यात आले होते. परंतु आता मूळ ठिकाणी बांधकाम पूर्ण असूनही केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मूळ मतदान केंद्र पूर्ववत सुरू करावे. चुकीच्या यादीत गेलेल्या मतदारांची नावे योग्य यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अन्यथा मतदानावर बहिष्कार
“आम्हाला आमच्या परिसरातीलच मतदान केंद्र हवे आहे. वाडी संस्थान परिसर पुन्हा कार्यरत करावा. नागरिकांच्या सोयीचा आणि हक्काचा विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू,” असा इशारा यावेळी स्थानिक नागरिकांनी दिला.