---Advertisement---
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला मानवतेला काळिमा फासणारा आहे. गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हायला हवी, असे स्पष्ट करीत सर्व देशांनी पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आणि दहशतवादाविरोधातील लढाईत बिनशर्त एकत्र यावे, असे आवाहन क्वाड सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केले.
पर्यटकांवर हल्ल्यासाठी दोषी असणारे, कट रचणारे आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांना कोणताही विलंब न करता न्यायासमोर आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. क्वाड संघटनेचे सदस्य असलेले देश अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी बुधवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनातून २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
निवेदनात पुढे म्हटले की, क्वाड सर्व प्रकारच्या हिंसक दहशतवादी घटनांचा निषेध आणि सीमापार दहशतवादाविरोधात सहकार्यासाठी क्वाड वचनबद्ध आहे. यावेळी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, आम्ही सर्वजण खुले आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील देशांना निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे जेणेकरून ते विकास आणि सुरक्षिततेबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. तथापि, परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचा किंवा मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानी सैन्यात चार दिवसांच्या लष्करी संघर्षाचा उल्लेख संयुक्त निवेदनात करण्यात आला नाही. क्वाडच्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाचे पेनी वॉन्ग आणि जपानचे टेकाशी इवाया उपस्थित होते.
चीनच्या वाढत्या लष्करी सामर्थ्यावर चिंता
पूर्व चीन समुद्र आणि दक्षिण चीन समुद्रात बीजिंग वाढवत असलेल्या लष्करी ताकदीवर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. बळजबरीने किंवा जबरदस्तीने यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही एकतर्फी कृतींना आम्ही आमचा तीव्र विरोध पुन्हा व्यक्त करतो, असे चीनचा थेट उल्लेख न करता क्वाडने निवेदनात म्हटले आहे.