---Advertisement---
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुढील पिढीच्या जन वाहतुकीसाठी एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप जाहीर केला आहे. यामध्ये शहरी भागात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, हायपरलूप आणि दुर्गम भागात रोपवे, केबल बस आणि फ्युनिक्युलर रेल्वेचा समावेश आहे.
भारतातील वाहतूक क्षेत्र एका मोठ्या संक्रमणातून जात आहे.
यामध्ये ११ आघाडीच्या वाहन उत्पादकांकडून ट्री बँक, मोबाईल आधारित ड्रायव्हिंग चाचण्या आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिनसारखे उपक्रम हाती घेतले आहेत, असे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी सांगितले. २५ हजार किमीचे दुपदरी महामार्ग चार पदरी करणे, प्रमुख मार्गावर इलेक्ट्रिक मास रॅपिट ट्रान्सपोर्ट नेटवर्क स्थापित करणे आणि रस्ते बांधकाम दररोज १०० किमीपर्यंत वाढण्याच्या योजना अजेंड्यावर आहेत.
आम्ही नवोपक्रमाला चालना देत आहोत. जनसंपर्कात क्रांती घडत आहे, असे गडकरी म्हणाले. भारतात प्रवासाचे स्वरूप बदलण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. यात केवळ महानगरांमध्ये नाही, तर दुर्गम ग्रामीण भागांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. आम्ही केदारनाथसह ३६० ठिकाणी रोप-वे, केबल कार आणि फ्युनिक्युलर रेल्वेची उभारणी केली जात आहे. यापैकी ६० प्रकल्पांवर काम आधीच सुरू झाले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
वर्षभरात महामार्ग होणार अमेरिकेसारखे
मला खात्री आहे की एक वर्षाच्या आत आमचे महामार्ग मी ज्या अमेरिकन रस्त्यांवर भर देत आहे, त्यांच्या दर्जा आणि गुणवत्तेशी जुळतील. महानगरांमध्ये केबल-रन-बसेस, विमानांसारख्या सुविधांसह इलेक्ट्रिक रॅपिड मास ट्रान्सपोर्ट बसेस असतील, ते दिवस दूर नाहीत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.