---Advertisement---
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी सकाळी अर्जेंटिना येथे पोहोचले. यावेळी त्यांनी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. यावेळी खनिजे, ऊर्जा, व्यापारात सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले आणि दोन्ही देशांनी सहा सामंजस्य करार केले. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या समकक्ष नेत्यांनी कराराच्या दस्तावेजाची देवाणघेवाण केली.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या एक्स खात्यावर लिहिले की, भारत आणि अर्जेंटिनामध्ये सहा सामंजस्य करार झाले. दोन्ही देश
शेती, महत्त्वाची खनिजे, व्यापार आणि गुंतवणूक आणि ऊर्जा यासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांच्यातील द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाली.
फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मॉरिसियो मॅक्री यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचले. दोन्ही देश व्यापार, संरक्षण, महत्त्वाची खनिजे, तेल आणि वायू, अणुऊर्जा, शेती, संस्कृती आणि तंत्रज्ञान यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करीत आहे. शनिवारी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांचे उपरोक्त क्षेत्रात भागीदारी आणि सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले.
५७ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय दौऱ्यावर अर्जेंटिनाला पोहोचले आहेत. तथापि, पंतप्रधान म्हणून मोदींचा हा दुसरा अर्जेंटिना दौरा आहे. २०१८ मध्ये त्यांचा हा दौरा जी-२० शिखर परिषदेच्या संदर्भात होता. पंतप्रधान मोदी यांचे अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनोस एअरइस येथील एझेइझा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर मोठ्या संख्यने उपस्थित भारतीय समुदायाने त्यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत केले.
मोदी चार दिवसांच्या ब्राझील दौऱ्यावर
अर्जेंटिनाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी रविवारी चार दिवसांसाठी ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे पोहोचले. राष्ट्रपती लुला यांच्या निमंत्रणावरून ते १७ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होईल.
तीन वर्षात व्यापार दुप्पट
भारत-अर्जेंटिना द्विपक्षीय व्यापार तेजीत आहे. २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत व्यापार दुप्पट झाला आहे, जो २०२२ मध्ये ६.४ अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला आहे. २०२१ आणि २०२२ मध्ये भारत अर्जेंटिनाचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. २०२४ मध्ये भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील एकूण वार्षिक द्विपक्षीय व्यापार ५.२३ अब्ज डॉलर्स होता, ज्यामुळे भारत अर्जेंटिनाचा पाचवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि निर्यात गंतव्यस्थान बनला.